लातूर | प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंध असलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करताना अत्यंत निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका शिक्षकाने चक्क धाब्यावर बसून दारू पित पेपर तपासणी केल्याचा प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाने सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व पालकांकडून होत आहे. शिक्षण विभागाने या घटनेची दखल घेतली असून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
Tags
लातूर जिल्हा