नळदुर्ग नगरपालिकेतील स्वच्छता कामातील अनियमिततेवर काँग्रेस नगरसेवक आक्रमक; ठेकेदाराचे टेंडर रद्द करण्याची मागणी


नळदुर्ग :- प्रतिनिधी :- नळदुर्ग शहरातील घनकचरा संकलन व स्वच्छता कामामध्ये होत असलेल्या गंभीर अनियमितता, स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष आणि शहरातील बिघडलेल्या स्वच्छता व्यवस्थेविरोधात काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. संबंधित ठेकेदार कंपनीचे टेंडर तात्काळ रद्द करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्त, संभाजीनगर यांच्याकडे केली आहे.
दि. ११ मे २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. नळदुर्ग नगर परिषद हद्दीत घनकचरा संकलन व स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून गंभीर स्वरूपाच्या अनियमितता होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदार कंपनीकडून स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शासन नियमांनुसार आवश्यक असलेले सुरक्षा साहित्य कामगारांना उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे त्यांनी नमूद केले. शहरातील स्वच्छता कामातही निष्काळजीपणा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख तक्रारींमध्ये स्वच्छता कामगारांना सेफ्टी शूज, रेनकोट, युनिफॉर्म, हातमोजे व इतर सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आवश्यक साधनसामग्री आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, कामगारांची हजेरी नोंद व वेतन नोंदी व्यवस्थित ठेवण्यात येत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ठेकेदार कंपनीकडून कंत्राटातील अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे.
डम्पिंग ग्राउंडवर कचरा उघड्यावर टाकला जात असून प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे पर्यावरण प्रदूषणात वाढ होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
दरम्यान, यापूर्वीही या विषयावर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना अनेक वेळा लेखी निवेदने देण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर प्रकरणात संबंधित ठेकेदारासह नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचीही चौकशी करून कारवाई करावी तसेच संबंधित टेंडर रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर विरोधी गटनेते मारुती खारवे, नगरसेवक आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, झुलेखाबेगम इनामदार, मदिना बागवान, कमलबाई गायकवाड, मन्नाबी कुरेशी, नसीर इनामदार, सईद बागवान, रवी गायकवाड आणि लखन भोसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post