देवकुरुळी येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद



तुळजापूर :- प्रतिनिधी :-  सुरज थोरात
 देवकुरुळी येथे खरीप हंगाम सन २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य तसेच शासकीय कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हणमंत जाधव हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड तसेच मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले उपस्थित होते.

यावेळी डॉ. भगवान अरबाड यांनी शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य जपण्याचे महत्त्व विशद केले. त्यांनी बीजप्रक्रिया, योग्य वाण निवड, संतुलित खत व्यवस्थापन, सिंचनाचे नियोजन तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बियाण्यांपासून होणारे रोग टाळण्यासाठी बीजप्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे, प्रात्यक्षिक प्लॉट, फळबाग लागवड, शेततळे आणि आधुनिक कृषी अवजारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ अलमले यांनी केली. खरीप हंगामाचे नियोजन आणि जलसंधारणासाठी जलतारा खड्ड्याचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.

यावेळी सरपंच हणमंत जाधव यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास ग्राम महसूल अधिकारी प्रगती पवार, ग्रामपंचायत अधिकारी वैभव ताटे यांच्यासह देवकुरुळी गावातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक माहिती मिळाल्याने यंदाचा हंगाम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post