नवी दिल्ली / मुंबई प्रतिनिधी : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा वेगाने सुरू झाली असून, येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भातील अंतिम चर्चेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डॉ. श्रीकांत शिंदे हे सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले असून, पक्ष संघटन आणि विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांची सक्रिय भूमिका राहिली आहे. दुसरीकडे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तळागाळातील जनसंपर्क, लोकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे आणि अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये बजावलेली भूमिका यामुळे त्यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे. सध्या भाजपनंतर तेलुगू देसम पक्षाकडे १६ खासदार असून, त्यानंतर शिवसेनेकडे १३ खासदार असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून अथवा पंतप्रधान कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांबाबत सुरू असलेल्या चर्चा या सध्या राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार असल्याचे मानले जात आहे.
Tags
धाराशिव जिल्हा