तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान:– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला बळकटी देण्याच्या दृष्टीने कृषि विभाग, जिल्हा परिषद पालघर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कोकणेर, तालुका पालघर येथे वनराई बंधारे यशस्वीरीत्या बांधण्यात आला. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवले जाऊन ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून विहिरी, बोअरवेल व भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार आहे.
जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी,तालुका कृषी अधिकारी स्मिता पाटील,जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामपंचायत, सदस्य,स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधाऱ्यांची उभारणी गावातील शेतकरी, सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर अशा सर्वांच्या सहभागातून यशस्वी झाला.
वनराई बंधारे हे कमी खर्चिक, पर्यावरणपूरक व परिणामकारक जलसंधारणाचे साधन असून त्याचा थेट फायदा शेतीस होतो. या बंधाऱ्यांमुळे रब्बी व उन्हाळी हंगामातही पाण्याची उपलब्धता वाढून शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच मृद्क्षय रोखला जाऊन जमिनीची सुपीकता टिकून राहणार आहे.
या उपक्रमामुळे कोकणेर ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून जिल्हा परिषद पालघरच्या जलसंधारण व शाश्वत शेती धोरणाला स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचे वनराई बंधारे उभारून पाणी व्यवस्थापनात सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
Tags
जिल्हा पालघर