उपशीर्षक: किरकोळ वादातून विकोपाला गेले प्रकरण; 19 वर्षीय कृष्णा रसाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू
तुळजापूर प्रतिनिधी | दैनिक आम् संघर्ष टाईम्स
शहरातील दीपक चौक परिसरात घडलेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण तुळजापूर शहर हादरून गेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या रक्तरंजित घटनेत 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत युवकाचे नाव कृष्णा आनंत रसाळ (वय 19, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 मेच्या रात्री ते 3 मेच्या पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक चौक येथे कृष्णा व एका अज्ञात व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला सामान्य भांडण वाटणारा हा वाद अचानक विकोपाला गेला.
वादाच्या भरात अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने कृष्णा यांच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत कृष्णा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
जखमी कृष्णा यांना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने दिनांक 3 मे रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार बालाजी कामतकर यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून हल्लेखोर फरार आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Tags
जिल्हा धाराशिव