सोलापूर,:- (प्रतिनिधी):- दिनांक 21 (आम् संघर्ष टाईम्स online) – महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर जिल्हा संघटकपदी मा. रजनीकांत इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने त्यांना अधिकृत निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थेच्या वार्षिक बैठकीमध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील संघटक पदांसाठी एकूण 36 सामाजिक कार्यकर्त्यांची निवड जाहीर करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थेकडून अधिकृत नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दरवर्षी व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे तसेच सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल शासनाकडून घेतली जाते.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात व्यसनमुक्ती आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे मा. रजनीकांत इंगळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सोलापूर जिल्हा संघटकपदी प्राधान्याने निवड करण्यात आली असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
मा. इंगळे यांच्या निवडीमुळे सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील काळात त्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.