ऑपरेशन टायगर यशस्वी!
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे शिवसेना पक्षात सहर्ष स्वागत
धाराशिव, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या खंबीर, विकासाभिमुख आणि गतिमान नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. जिल्ह्यातील जनतेनेही त्यांच्यावर मोठा विश्वास आणि प्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून पायाभूत सुविधा, रोजगार, शेती, उद्योग आणि जनकल्याणाच्या विविध योजनांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे पक्षात सहर्ष स्वागत करत, त्यांच्या आगमनामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
"ऑपरेशन टायगर" यशस्वी झाल्याने धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, येणाऱ्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
Tags
धाराशिव जिल्हा